ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवार गट सहभागी होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले…

Sharad Pawar : राज्यात पहिलीपासून लागू करण्यात आलेल्या त्रिभाषा निर्णायाविरोधात म्हणजेच हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्यास वेळोवेळी सांगूनही त्यावर तोडगा निघत नसल्याने आता ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीविरोधात वेगवेगळा नाहीतर एकच मोर्चा निघणार आहे. याची घोषणा उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
काल उद्धव आणि राज यांच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या. दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे मोर्चांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, संजय राऊत यांनी ट्वीट करत ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चात सगळ्या क्षेत्रातील लोकांनाी सहभागी होण्याचे आवाहान करण्यात आले आहे. ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मोर्चा मुंबईत निघणार आहे.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सहभागी होणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच याविषयी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही. पण पाचवीपासून पुढे हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली. मुबंईला गेल्यावर याबाबत त्यांना भेटेन, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. ते कोल्हापूरला आले असताना त्यांनी याविषयी माध्यमांसोबत संवाद साधला. तसेच राज्यातील इतर मुद्यांवरही त्याने भाष्य केले.
या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांना देखील सहभागी होण्याची आवाहन करण्यात आले आहे. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे. त्यांचे भाष्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत असे नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल. जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट विधान शरद पवार यांनी केले आहे.
संजय राऊतांना मिश्किल टोला
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही, हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत, असा मुश्किल टोला शरद पवार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा : ….म्हणून मोर्चाची तारीख बदलली! राज ठाकरेंचा मला फोन आला…; संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी





