रशियाचे अध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येणार?

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांदरम्यान विचारांच्या वार्षिक आदानप्रदानासाठी ते भारतात येणार असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. अध्यक्ष पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारत भेटीचे निमंत्रण मिळाले आहे, असे क्रेमलिनचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत सांगितले. पुतीन यांच्या भेटीच्या तारखा २०२५ च्या सुरुवातीला निश्चित केल्या जातील, असे ते म्हणाले.
आमच्या नेत्यांनी वर्षातून एकदा बैठक घेण्याचा करार केला आहे. यावेळी, आमची पाळी आहे. आम्हाला मोदींचे आमंत्रण मिळाले आहे आणि आम्ही नक्कीच त्याचा सकारात्मक विचार करू… आम्ही पुढील वर्षीच्या सुरुवातीला तात्पुरत्या तारखा ठरवू, असे उशाकोव्ह म्हणाले.
पुतीन आणि मोदी नियमित संपर्क ठेवतात, दर दोन महिन्यांनी एकदा टेलिफोन संभाषण करतात. दोन्ही नेते वैयक्तिक भेटी देखील घेतात, विशेषत: आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची भेट होत असते. जुलैमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी २२ व्या रशिया-भारत शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी मॉस्कोला दोन दिवसीय भेट दिली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांनी ब्रिक्स गटाच्या शिखर परिषदेसाठी रशियातल्या कझान शहराला भेट दिली होती.





