Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांची ‘प्रदेशाध्यक्ष’पदावरून उचलबांगडी होणार? सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
Rupali Chakankar: सत्य समोर येईलच, अशी भूमिका मांडणाऱ्या चाकणकर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी टिकणार की त्यांच्यावर पक्ष शिस्तीचा बडगा उगारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rupali Chakankar: भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आता आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही सुट्टी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
देवगिरीवर खलबते; आमदारांची तातडीची बैठक
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून पक्षाची मोठी बदनामी होत असल्याची भावना पक्षश्रेष्ठींमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सायंकाळी ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चाकणकर यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होण्याची आणि हे पद कोणाकडे सोपवायचे, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. “कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे संकेत सुनील तटकरे यांनी आधीच दिले आहेत.
जादूटोण्याचे आरोप चाकणकरांनी फेटाळले
दुसरीकडे, आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. जादूटोण्यासाठी अनामिका बोट कापल्याचा आरोप फेटाळताना त्यांनी धायरी येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ शेअर केला. गाडीतून उतरताना दुखापत झाल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. “गेल्या २२ वर्षांच्या राजकीय प्रवासात प्रगती होत असताना मुद्दाम चिखलफेक केली जात असून, कुटुंबाला दिला जाणारा त्रास भयावह आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळे चाकणकरांना आधीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, आता त्यांचे संघटनात्मक पदही जाण्याची चिन्हे गडद झाली आहेत. दरम्यान, सत्य समोर येईलच, अशी भूमिका मांडणाऱ्या चाकणकर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी टिकणार की त्यांच्यावर पक्ष शिस्तीचा बडगा उगारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




