रश्मी बर्वे विधानसभा निवडणूक लढवणार?

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रामटेक या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना तिकीट दिले होते. मात्र त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र ग्राह्य न धरण्यात आल्याने त्यांना लोकसभेची निवडणूक लढवता आली नाही.
निवडणुकीच्या तोंडावर असताना जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर हायकोर्टाने त्यांना क्लीन चीट देत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करणे चुकीचे ठरविले होते. पुढे या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून नागपूर खंडपीठाने निर्णय कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्या नेमकं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हे अद्याप स्पष्ट नाही.





