Devendra Fadnavis : राहुल गांधी आता माफी मागतील का? मुख्यमंत्री फडणवीस यांची विचारणा
Rahul Gandhi | Devendra Fadnavis – सीएसडीएसने दिलेल्या डेटाच्या आधारावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. तसेच त्यांनी योग्य पद्धतीने निवडून आलेल्या आमच्या सरकारला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यांनी ज्या डेटाच्या आधारे आरोप केले होते, तो डेटा सीएसडीएसने मागे घेताना, माफी मागितली आहे.
त्यामुळे आता त्या डेटाच्या आधारावर आरोप करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला वाटत नाही. ज्याप्रमाणे सिरियल किलर असतात, त्याप्रमाणेच ते सिरियल लायर आहेत, अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना केली.
सामाजिक व राजकिय शास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या लोकनिती-सीएसडीएसने महाराष्ट्रातील निवडणूकांच्या संदर्भात आपल्या अधिकृत सोशल मिडियावरुन माहिती पोस्ट केली होती. मात्र, मंगळवारी सीएसडीएसचे प्रा. संजय कुमार यांनी, आपली जुनी पोस्ट डिलीट करताना, माफी मागताना, टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला याची कबुली दिली. याच संस्थेने उपलब्ध केलेल्या डेटाच्या अधारावर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडले होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हल्लाबोल केला.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात देखील भाकित केले. ते म्हणाले की, मला वाटते की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. इंडिया आघाडीकडे बहुमताचा आकडा नाही. त्यांचा उमेदवार कोण आहेत, हे मला आतापर्यंत तरी माहिती नाही, मात्र त्यांचा पराभव होणार आहे, हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.





