Ravichandran Ashwin warns about ODI cricket future : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय क्रिकेटच्या (ODI) भवितव्याबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. आपल्या ‘ऐश की बात’ (Ash ki Baat) या यूट्यूब चॅनेलवर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधताना, अश्विनने २०२७ च्या विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मध्यंतरीचे ओव्हर्स ठरतायत कंटाळवाणे – अश्विनच्या मते, सध्याचे वनडे क्रिकेट अत्यंत ‘एकतर्फी’ आणि ओझे वाटणारे झाले आहे. विशेषतः १० ते ४० ओव्हर्समधील खेळावर त्याने टीका केली. “पहिल्या पॉवरप्लेनंतर खेळ खूपच सामान्य होतो. फलंदाज सहजपणे सीमापार फटके मारतात आणि गोलंदाजांना विकेट घेण्याच्या संधी कमी उरतात. हे फॉरमॅट आपली प्रासंगिकता गमावत असून ते ‘स्लो डेथ’कडे वाटचाल करत आहे,” असे स्पष्ट मत अश्विनने मांडले. काय आहे अश्विनचे ‘फिफा’ मॉडेल? वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी अश्विनने फुटबॉलमधील ‘फिफा’ (FIFA) मॉडेलचा अवलंब करण्याचा क्रांतिकारी सल्ला दिला आहे. द्विपक्षीय मालिका बंद करा: दोन देशांमधील वनडे मालिका पूर्णपणे बंद कराव्यात. फक्त विश्वचषक: केवळ टी-२० लीग खेळवल्या जाव्यात आणि दर चार वर्षांनी एकदाच ५० ओव्हर्सचा विश्वचषक आयोजित करावा. यामुळे चाहत्यांमध्ये या फॉरमॅटबद्दल उत्सुकता टिकून राहील. घरगुती क्रिकेटला महत्त्व: असे केल्यास विजय हजारे सारख्या घरगुती स्पर्धांचे महत्त्व वाढेल, कारण आंतरराष्ट्रीय संघांना येथूनच आपला विश्वचषक संघ निवडावा लागेल. हेही वाचा – IND vs PAK : यंदा भारत-पाकिस्तानमध्ये इतके हाय-व्होल्टेज सामने! कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर आव्हान वाढणार – अश्विनने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, सध्या लोक विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या मोठ्या खेळाडूंमुळे वनडे सामने पाहत आहेत. मात्र, या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर या फॉरमॅटचा प्रभाव आणि रस कमी होईल. आयसीसीने जर तांत्रिक नियमांत (उदा. दोन नवीन चेंडूंचा वापर, ५ फिल्डर्सचा नियम) बदल करून नाविन्य आणले नाही, तर हा प्रकार केवळ इतिहास जमा होईल, अशी भीती त्याने व्यक्त केली.