Bollywood : अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. मात्र एकीकडे हा चित्रपट सुपरहिट ठरत असताना अनेकांनी यावर टीका देखील केली. जावेद अख्तर यांनी या चित्रपटाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही आता ‘अॅनिमल’वर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हा चित्रपट अद्याप पाहिला नसून, पाहणारही नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हिंसाचार आणि महिलांबद्दलच्या दृष्टिकोनापासून ते गैरवर्तन आणि वादग्रस्त संवादांपर्यंत चित्रपटात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यामुळेच या चित्रपटाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एका मुलाखतीत तापसी म्हणाली, “बऱ्याच लोकांनी मला ‘अॅनिमल’बद्दल सांगितले. या चित्रपटाची तुलना हॉलिवूडशी कृपया करू नये. जर ‘गॉन गर्ल’ आवडला असेल तर ‘अॅनिमल’ आवडायला काय हरकत आहे असं तर कुणी बोलू नये. आपला प्रेक्षकवर्ग पूर्णपणे वेगळा आहे. हॉलिवूडचा प्रेक्षक अभिनेत्याच्या हेअर स्टाईलची नक्कल करत नाही, ते खऱ्या आयुष्यात फिल्मी डायलॉगचा वापर करत नाहीत.”
यावेळी तापसीला असे चित्रपट बनले पाहिजे का? यात काम करशील का? असे प्रश्न विचारले त्यावर तापसी म्हणाली, असे चित्रपटही एक वेगळा उद्देश समोर ठेवून बनवले पाहिजे. तसेच या चित्रपटात कोणी काम केले पाहिजे हे सांगण्याचा अधिकार मला नाही, प्रत्येकजण सुजाण आहे. मी तरी अशा चित्रपटांमध्ये काम करणार नाही,” असे तिने सांगितले.
दरम्यान, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रश्मिकानं रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका केली आहे.