IPL 2027 : MS धोनी IPL 2027 मध्ये खेळणार? CSK च्या खेळाडूने दिली मोठी अपडेट, म्हणाला…
IPL 2027 : आकाशच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सामील झाल्यापासून धोनीने एकही सराव सत्र चुकवलेले नाही. तो सातत्याने फलंदाजीचा सराव करत असून प्रत्येक सत्रात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे.

IPL 2027 : पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२७ हंगामासाठी आतापासूनच तयारीला वेग आला आहे. आयपीएलला अद्याप काही महिने बाकी असले तरी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार खेळाडू एमएस धोनीविषयी चर्चांना उधाण आले आहे.
धोनी IPL २०२७ च्या हंगामात खेळणार की नाही, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल याने धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आकाश मधवालच्या मते, एमएस धोनी IPL २०२७ मध्ये खेळताना दिसू शकतो. मात्र, धोनीने स्वतः याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सध्या धोनीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय म्हणाला आकाश मधवाल?
पुढील आयपीएल हंगामात खेळायचे की नाही, याचा अंतिम निर्णय धोनीच घेईल, असे आकाश मधवालने स्पष्ट केले. मात्र, धोनी ज्या पद्धतीने सराव करत आहे, ते पाहता तो पुढील हंगामातही खेळेल, असा विश्वास आकाशने व्यक्त केला.
आकाशच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सामील झाल्यापासून धोनीने एकही सराव सत्र चुकवलेले नाही. तो सातत्याने फलंदाजीचा सराव करत असून प्रत्येक सत्रात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. धोनीचा सरावातील उत्साह आणि त्याची तयारी पाहता, तो सध्या आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे आकाशला वाटते.
याशिवाय आकाशने धोनीच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि संघातील त्याच्या भूमिकेचेही कौतुक केले. “धोनी खूप शांत आहे आणि खेळाडू त्याच्याशी सहजपणे बोलू शकतात. कोणाला काही अडचण किंवा प्रश्न असल्यास ते त्याचा सल्ला घेऊ शकतात. धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे हा तरुण खेळाडूंसाठी विशेष अनुभव आहे. त्याच्या उपस्थितीचा संपूर्ण संघाला मोठा फायदा होतो.”असे आकाशने सांगितले.
धोनीकडून IPL २०२७ बाबत अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नसले तरी, त्याचा सराव आणि मैदानावरील सक्रियता पाहता तो पुढील हंगामातही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो, असा आकाश मधवालचा विश्वास आहे. आता एमएस धोनीच्या अधिकृत निर्णयाची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे.






