Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची भेट घेण्यापूर्वी मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उद्या ३० मे पासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काल पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आता आरपारची लढाई असून, रणरणत्या उन्हात सर्व गोष्टींचा त्याग करून खाटेवर बसून उपोषण करणार असल्याचा कठोर निर्णय घेतला.
या घोषणेनंतर मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्ठमंडळ आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे. मनोज जरांगे यांची भेट घेण्यापूर्वी मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना काही गैरसमज झाला आहे, मी आज भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगेन. शिवाय माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील, असे मोठं वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे.
विखे पाटील म्हणाले की, मागील बैठकीत हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी, आंदोलनादरम्यान शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी तसेच इतर प्रलंबित मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही कायदेशीर अडचणींमुळे प्रक्रियेला विलंब होत असला तरी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
“मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझा थेट फोनवर संवाद झाला नाही. मात्र, सरकारने घेतलेले सर्व निर्णय कागदोपत्री स्वरूपात त्यांच्यासमोर ठेवले आहेत. काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आजच्या भेटीत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे विखे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून अडीच लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून वंशावळ नोंदी व्यवस्थित झालेल्या नाहीत. तसेच मोडी लिपी आणि जुन्या दस्तऐवजांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा गॅजेट संदर्भात काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असल्याचे सांगत, त्या जरांगे पाटील यांना समजावून सांगितल्यानंतर ते या मुद्द्यावर आग्रही राहणार नाहीत, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच ठोस भूमिका घेतली होती, असा दावा करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली.
काय निर्णय घेणार?
दरम्यान, दुसरीकडे मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता चर्चा नको निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज विखे पाटील यांच्या भेटीनंतर जरांगे नेमका काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : Pune News : पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं! विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर






