Tanu Weds Manu 3 : ‘तनु वेड्स मनु 3’ मध्ये कंगना रणौत आणि आर. माधवन दिसणार नाहीत? आगामी भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता
Tanu Weds Manu 3 : आता या लोकप्रिय फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Tanu Weds Manu 3 : बॉलिवूडमधील लोकप्रिय रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तनु वेड्स मनु’ आणि त्याच्या सिक्वेलला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. कंगना रणौत आणि आर. माधवन यांच्या जोडीने या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. आता या लोकप्रिय फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
तिसऱ्या भागात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कंगना रणौत आणि आर. माधवन यांची जुनी पात्रे दिसणार नसून, नव्या कलाकारांसह एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.
‘तनु वेड्स मनु 3’ मध्ये नवी कथा, नवे कलाकार!
मिड-डेच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक मिताक्षरा कुमार या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागावर काम करत आहे. यावेळी निर्मात्यांचा भर जुन्या पात्रांची कथा पुढे नेण्याऐवजी नवीन पात्रांच्या माध्यमातून एक वेगळी प्रेमकथा सादर करण्यावर आहे. मात्र, चित्रपटातील विनोद, बिनधास्तपणा आणि हटके शैली कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मात्र, नव्या भागातील कलाकारांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या चित्रपटात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
कंगना आणि माधवन यांची लोकप्रिय जोडी दिसणार नाही?
‘तनु वेड्स मनु’च्या पहिल्या दोन भागांमध्ये कंगना रणौतने तनुजा त्रिवेदी, तर आर. माधवनने मनु शर्मा ही व्यक्तिरेखा साकारली होती. दोघांच्या अभिनयाला आणि त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र, तिसऱ्या भागात या दोन्ही कलाकारांची जुनी पात्रे परत येणार नसल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी तरुण कलाकारांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ हा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटात तनु आणि मनु यांच्या वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले होते. या दोन्ही भागांना प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला होता. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर आता या फ्रँचायझीचा नवा भाग कसा असणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Ramayana Advance Booking : रामायणाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात; तिकीट दर पाहून चाहते थक्क





