केंद्रात मंत्री होणार? थेट प्रश्नावर CM फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले ” जेव्हा दिल्लीत….”

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारण कधी काय होईल याचा काही नेम नाही. सध्याच्या राजकारणात ‘जर तर’च्या विधानाला थारा नाही. थोडक्यात राजकारणात काहीही होऊ शकतं. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीतून महायुतीत येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांच्या लक्ष लागलेले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजप त्यादृष्टीने तयारी करत आहे. मुंबई पालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा उबाठा तयारी करत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू यांची राजकीय युतीची घोषणेबाबत दसरा मेळाव्याचा मुहूर्त ठरला असल्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. अशा सगळ्या राजकीय वातावरणात भाजपचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याच्या जोरदार चर्चा होत आहे. आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
केंद्रात मंत्री होणार का?
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. या मुलाखतीत फडणवीस यांना केंद्रात मंत्री होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी जोपर्यंत इथे काम करायचं आहे तोपर्यंत इथे काम करणार. जेव्हा दिल्लीत काम करायचं सांगणार तेव्हा दिल्लीत काम करणार, असं विधान केलं आहे. पुढे ते म्हणाले, जेव्हा सांगतील दोन्ही ठिकाणी काम करु नका तर मी स्वत:च्या घरी जाईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राजकारणात पुढचा रस्ता कुणालाच ठाऊक नसतो
यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. राजकारणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, राजकारणात पुढचा रस्ता कुणालाच ठाऊक नसतो. महत्त्वकांक्षेला काही महत्त्व नसतं. राजकारणात उद्या काय होणार आहे ते आपण बोलू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या गोष्टी जेवढ्या संक्षिप्त आणि ताब्यात ठेवणार तेवढं चांगलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : लडाखमध्ये हिंसक निदर्शने ; आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू अन् अनेक जखमी ; जाणून घ्या नेमकं कारण काय ?





