Gautam Gambhir Salary : द्रविडपेक्षा गंभीरला मिळणार जास्त मानधन? जाणून घ्या, किती असेल फरक…

Gautam Gambhir Salary : गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. बीसीसीआयने मंगळवारी (09 जुलै) गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवल्याची माहिती शेअर केली. गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला किती मानधन मिळणार? माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा गंभीरचे मानधन कमी की जास्त? तर याबद्दल जाणून घेऊया….
द्रविडला किती मिळत होते मानधन…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वार्षिक 12 कोटी रुपये पगार देण्यात आला होता. म्हणजे द्रविडचा एका महिन्याचा पगार एक कोटी रुपये होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक हे हाय प्रोफाईल काम आहे, ज्यामुळे बीसीसीआय चांगला पगार देते. द्रविडने नोव्हेंबर 2021 ते जून 2024 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.
गौतम गंभीरला किती मिळेल मानधन?
मीडिया रिपोर्ट्स पाहिले तर, गंभीरला मानधन म्हणून राहुल द्रविडपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात म्हणजेच वार्षिक 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त. मात्र, नवे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गंभीरच्या पगाराची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्याला राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार दिला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
किती आहे गंभीरचा कार्यकाळ ?
गौतम गंभीरच्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंका दौऱ्यापासून होणार आहे. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर टीम इंडिया 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची टी-20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू होणार आहे. गंभीरचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. गंभीरच्या कोचिंग कार्यकाळात, मेन इन ब्लू 2026 टी-20 आणि 2027 एकदिवसीय विश्वचषकासह अनेक महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा खेळणार आहे.
Team India : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, जय शाहांनी केली मोठी घोषणा…
गंभीरची कारकिर्द
एक खेळाडू म्हणून, 2007 मध्ये भारताच्या टी-20 विश्वकरंडक विजयात आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक विजयात गंभीर संघाचा भाग होता. त्याने 2011 ते 2017 या सात आयपीएल हंगामांसाठी कोलकाताचे नेतृत्व केले आणि ज्या दरम्यान फ्रंचायची पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरली होती. कर्णधार म्हणून त्याने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा आयपीएल जेतेपदांना गवसणी घातली आहे.
प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही
42 वर्षीय गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही, तो दोन आयपीएल फ्रँचायझींमध्ये कोचिंग स्टाफची जबाबदारी सांभाळत आहे. आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये तो लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, तर 2024 च्या हंगामात तो केकेआरमध्ये सामील झाला होता. गंभीरने एलएसजीमध्ये राहिल्यानंतर पहिल्या दोन हंगामात संघाला प्लेऑफमध्ये नेले होते. या व्यतिरिक्त कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्याचा त्याच्याकडे अनुभव नाही.





