Eknath Shinde : एकनाथ शिंदे २ महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ‘या’ नेत्याची भविष्यवाणी खरी ठरणार?

Eknath Shinde : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका शिवसेना (शिंदे गट)ला बसला असून, याबाबत शिंदे गटाकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही घातला होता.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. महापालिका निवडणुकांत भाजप वेगळे लढणार होते, पण आता त्यांना माघार घ्यावी लागेल.
आता महायुती एकत्र लढेल. शिंदे यांनी अमित शाह यांना भेटून त्यांच्यावर प्रभाव टाकला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांना मुख्यमंत्री न केल्याचा हा बदला असावा. येत्या एक-दोन महिन्यांत शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले, शरद पवार हे चाणक्य आहेत. काही काळापूर्वी पवार आणि शिंदे यांची बैठक झाली होती, त्यातून शिंदे यांनी योग्य संदेश दिला आहे. अमित शाहांसारख्या नेत्याला शिंदे यांनी प्रभावित केले आहे.
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. महापालिका निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आंबेडकरांच्या या भविष्यवाणीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत.





