‘बागेश्वर धाम’चे धीरेंद्र कृष्ण शास्त्री राजकारणात प्रवेश करणार?

नवी दिल्ली : बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारत लवकरच हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर ते लवकरच राजकारणात एंट्री देखील करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल. आज आमच्या दरबारात परदेशातूनही लोक सहभागी होत आहेत. ते ख्रिश्चन धर्माचे असले तरी, सनातन धर्मावर त्यांचा विश्वास आहे.’ असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी, ‘याचा अर्थ असा की, परदेशी लोकांनाही असा भारत हवाय, जिथं प्रत्येकजण अभिमानानं हिंदुत्वाची चर्चा करू शकेल. जातीभेदाकडं दुर्लक्ष करा. कारण, आम्ही सगळे भारतीय आहोत. हिंदुस्थान म्हणजेच हिंदूंचं स्थान, असेही त्यांनी स्पष्ट यावेळी केले.
राजकारणाच्या प्रवेशाविषयी बोलताना, “सत्ता मिळवून सरकार बनवणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये. पण, जर कोणी आम्हाला पाठिंबा देऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही सर्व हिंदूंनी आम्हाला पाठिंबा द्यावा,” अशी विनंती करतो. भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल, असंही शास्त्री म्हणाले.





