काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हातमिळवणी करणार? आज राहुल गांधी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यात युतीवर होऊ शकते ‘शिक्कामोर्तब’

Jammu and Kashmir Assembly Elections । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आजपासून दोन दिवस जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीसाठी राहुल आणि खर्गे जम्मू आणि श्रीनगरमध्ये असतील.
या दौऱ्यात राहुल गांधी आणि खरगे निवडणुकीपूर्वी युतीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) नेते ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. येत्या गुरुवारी दोन्ही नेते काश्मीरला भेट देतील आणि एनसी नेतृत्वाची बैठक घेणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, दोघेही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महत्त्वाच्या बैठकीसाठी येत आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्ष आधीच राष्ट्रीय स्तरावर विरोधी इंडिया ब्लॉकचा भाग आहे. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच कोणत्याही राजकीय पक्षासोबत निवडणूकपूर्व युती होणार नसल्याचे सांगितले होते, मात्र या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसशी संपर्क साधल्यानंतर गांधी आणि खरगे भेट घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष, तारिक हमीद कारा, जे मंगळवारी जम्मूला पोहोचले, म्हणाले,’आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. भाजप आणि त्यांच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी हातमिळवणी करण्यास आम्ही तयार आहोत.’
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले,”माझ्या माहितीनुसार एनसीने आमच्या केंद्रीय नेत्यांशी आधीच संपर्क साधला आहे. काँग्रेस कोणत्या संघटनांशी हातमिळवणी करण्यास तयार आहे, असे विचारले असता कारा म्हणाले, “सर्व समविचारी पक्ष, मग ते जम्मू किंवा काश्मीरमधील असोत. एकच निकष म्हणजे ते समविचारी असावेत.”
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसी मध्ये निवडणूकपूर्व युती झाली होती. काँग्रेसने जम्मू विभागातील लोकसभेच्या दोन्ही जागा आणि लडाखची एक जागा लढवली होती, तर एनसीने काश्मीरच्या तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, काँग्रेसने तीनही जागा गमावल्या तर एनसीने दोन जागा जिंकल्या.
जम्मूमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, काँग्रेस मैदानी प्रदेश आणि चिनाब खोऱ्यातील विधानसभा जागा जिंकण्याकडे लक्ष देत आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, विकासाचा अभाव या मुद्द्यांवरून परिसरात भाजपविरोधात नाराजी असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.
=======================================





