आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देणार – अॅड. प्रकाश आंबेडकर

नेवासा : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता वडुले (ता. नेवासा) येथे कर्जबाजारी व आत्महत्याग्रस्त अल्पभूधारक शेतकरी स्व. बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरोदे कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले. तसेच, या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीवेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्व. बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप करणारी व्हिडिओ क्लिप प्रसारित केली होती. ही क्लिप अॅड. आंबेडकर यांना दाखवण्यात आली.
अॅड. आंबेडकर यांनी सरोदे कुटुंबाच्या भविष्यासाठी शासनाकडून विविध सवलती आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी नुकत्याच कुकाणा (ता. नेवासा) येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने केलेल्या रस्ता रोको आंदोलनाचा उल्लेख करत, आत्महत्याग्रस्त सरोदे कुटुंबाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचे अॅड. आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रसंगी प्रा. किसन चव्हाण, विशाल कोळगे, पोपटराव सरोदे, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र साळवे, शेवगांव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, सलीम इनामदार, बलभीम सकट, अशोकराव मिसाळ, अनिल जाधव, चरण त्रिभुवन, संतोष चौधरी, बाबासाहेब अल्हाट, विजय गायकवाड, संतोष कासोदे, दीपक सरोदे, योगेश गायकवाड, उत्तम गोर्डे, किशोर भारस्कर, सागर गायकवाड, राजू पठारे, सागर चक्रनारायण, सचिन साठे, आकाश इंगळे, शिवाजी म्हस्के, अशोक शिरसाट, नितीन गोर्डे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





