ठाकरे गटातून हकालपट्टीनंतर बडगुजरांसाठी भाजपचं दार खुलं? बावनकुळेंनी दिले संकेत

Chandrashekhar Bawankule | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केली. यातच आता सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
गुरुवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची संकल्प से सिद्धीतक उत्तर महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या संभाव्य प्रवेशावर भाष्य केले.
स्थानिक नेत्यांचा विरोध
बडगुजरांवर विविध प्रकारचे १७ गुन्हे दाखल असून कारवाई टाळण्यासाठी ते भाजपमध्ये येण्याची धडपड करत असल्याचे पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत संबंधित व्यक्ती गुन्हेगार नसतो. याचा विचार करून कुणाचेही मूल्यमापन व्हायला हवे, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले. Chandrashekhar Bawankule |
गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवायचे असल्याने भाजप आणि पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजरांच्या प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि ठाकरे गटाचे बडगुजर यांच्यात लढत झाली होती. याबाबत विरोध करत त्या म्हणाल्या की, “मी स्वतः बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली असून, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. त्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती, नारायण राणे यांच्यावर त्यांनी अटक होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे अशा व्यक्तीस पक्षात प्रवेश न देण्याची मागणी आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.”
यावर काही समज-गैरसमज असतात. ते दूर होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. आम्हालाही पक्ष संघटन वाढवायचे आहे. बडगुजरांबाबत सध्या काही ठरले नसून गिरीश महाजन पुढील भूमिका मांडतील, असे बावनकुळे यांनी सूचित केले. Chandrashekhar Bawankule |
सलीम कुत्ताबरोबर बडगुजरांनी पार्टी केल्याचा आरोप
दरम्यान, मागील वर्षी सुधाकर बडगुजर यांच्यावर नितेश राणेंकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता. तेव्हा सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या आरोपांनंतर बडगुजर चर्चेत आले होते. Chandrashekhar Bawankule |
हेही वाचा:





