Pune : गुप्तांची खैरात, तर अमितेश यांचा रद्दचा धडाका!

पुणे – शस्त्र परवाना मंजूर करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक निकष निश्चित केले आहेत. गेल्या दीड वर्षात ४०४ अर्ज फेटाळून १४० जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यंदा नव्याने फक्त २८ जणांना शस्त्र परवाने मंजूर केले असून, त्यामध्ये दहा वारसा हक्क आणि नऊ परवाने क्रीडापटूंच्या कोट्यातून मंजूर करण्यात आले आहेत.
२०२२ मध्ये तात्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकालात खैरातीसारखे शस्त्र परवाने दिले गेले. सन २०२१ ते २०२३ या कालावधीत तब्बल ६५९ परवाने दिले. यातील २०२२ या एका वर्षात २७९ परवाने दिले गेले. अमिताभ गुप्ता हे २० सप्टेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२२ या कलावधीत पोलीस आयुक्त होते.
गुप्तांच्या काळात शस्त्र परवाना वाटपाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात तब्बल सहाशेच्या आसपास शस्त्र परवाने वाटप झाले. यातील हगवणे बंधूंचे शस्त्र परवाना प्रकरण सध्या गाजत आहे. यामध्ये तात्कालीन अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर यांच्यावर विविध स्तरांवरून गंभीर आरोप होत आहेत. पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी शस्त्र परवान्यासाठी कडक निकष, नियमावली जाहीर केली.
१ जानेवारी २०२४ ते ३ जून २०२५ या कालावधीत पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी दाखल ५७२ अर्जांपैकी फक्त २८ अर्ज मंजूर करण्यात आले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ४९ जणांचे परवाने रद्द करून परवाना नूतनीकरणासाठी आलेले ९७ अर्ज फेटाळले. काही जणांना नोटीसही बजावली आहे. अनेकांनी स्वसंरक्षणाचे कारण दिल्यानंतर आयुक्तांनी समाजात भीती निर्माण करण्यासाठी शस्त्र परवाना देणार नाही, ठोस आणि जबाबदार कारण द्यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
“शस्त्र परवान्याच्या प्रक्रियेत कठोरता बाळगण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षितता आणि समाजातील शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.”- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.





