Sanjay Raut : आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळणार? संजय राऊतांनी एका वाक्यात स्पष्ट केलं म्हणाले…
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा असून, यावर पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. येत्या 19 जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनी त्यांना कार्याध्यक्षपद देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय झाल्यास पक्षातील त्यांचे महत्त्व आणखी वाढणार असून संघटनात्मक अधिकारही मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हाती येतील.
या चर्चांवर पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “पक्षातील असे निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माध्यमांमधून आदित्य ठाकरेंचं नाव समोर येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही, मात्र भविष्यात नेतृत्व तरुणांच्या हाती जाणं गरजेचं आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
विधान परिषदेवर कोण जाणार यावर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ: राऊत
दरम्यान, मे महिन्यात विधानपरिषदेतून काही सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा विधानपरिषदेसाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य करणे टाळले. ते म्हणाले “उद्या लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आहे. डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशात आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष सुरु झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हा गंभीर विषय आहे. विधान परिषदेवर कोण जाणार यावर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता
2003 साली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्यात आले होते, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांच्यावरही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यासाठी पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Aaditya Thackeray : मोठी राजकीय घडामोड! आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळणार?





