Panchayat 5 : ‘पंचायत ५’मध्ये अभिषेक त्रिपाठीचं लग्न होणार? प्रधानजींच्या पराभवानंतर कथेत येणार मोठा ट्विस्ट
Panchayat 5 : फुलेरा गावातील पुढची कथा काय असणार, याबाबत विविध चर्चा रंगत असतानाच दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Panchayat 5 : लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या नव्या सीझनबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. फुलेरा गावातील पुढची कथा काय असणार, याबाबत विविध चर्चा रंगत असतानाच दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
‘पंचायत’चे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नव्या सीझनबाबत माहिती दिली. सध्या ‘पंचायत ५’च्या एडिटिंगचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
नव्या सीझनच्या कथेबद्दल बोलताना ते म्हणाले, “निवडणुका झाल्या आहेत आणि प्रधानजी हरले आहेत. आता या पराभवानंतर त्यांचं आयुष्य कसं पुढे जातं, फुलेरा गावात राहताना प्रधानजींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्यांना प्रल्हादजी, सचिव आणि विकास यांच्याकडून कसा पाठिंबा मिळतो, हे कथेत दाखवलं जाईल.”
त्यामुळे यावेळी फुलेरा गावातील राजकारणासोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनाही महत्त्व मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. या नव्या वळणांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सचिवजींचं लग्न होणार का?
‘पंचायत ५’मध्ये सचिवजी म्हणजेच अभिनेता अभिषेक त्रिपाठी यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल होणार याबाबतही चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. विशेषतः सचिवजींचं लग्न होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
पाचवा सीझन शेवटचा नसेल
‘पंचायत ५’ हा शेवटचा सीझन असेल का असाही प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. मात्र, दीपक कुमार मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे की, पाचवा सीझन शेवटचा नसेल. त्यामुळे ‘पंचायत’ची कथा पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
‘पंचायत ५’ कधी प्रदर्शित होणार?
दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित ‘पंचायत’ ही वेबसीरिज २०२० मध्ये प्रदर्शित झाली होती. अभिषेक त्रिपाठी हा पंचायत सचिव पदाची नोकरी स्वीकारण्यासाठी फुलेरा गावात येतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांभोवती या मालिकेची कथा फिरते. या वेबसिरीजमध्ये नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैसल मलिक, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक यांच्यासह अनेक कलाकारांनी काम केलं आहे.
दरम्यान, ‘पंचायत ५’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, हा सीझन ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२६ च्या सुमारास प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फुलेरा गावातील पुढची कथा पाहण्यासाठी चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.
Night Skin Care: रात्री झोपण्यापूर्वी करा या ‘५’ गोष्टी; सकाळी चेहरा दिसेल फ्रेश आणि तजेलदार!



