मुंबई : ९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार असल्याचे सूतोवाच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यांच्या विधानाने राजकीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतेही मिशन सांगून राबवले जात नाही. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा पाहता, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालते, हे अनेक जणांना कळून चुकले आहे, त्यामुळे अनेक जण संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित आहे. मी पुढील ९० दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार असे सांगितलं होते. एक दिवस किंवा २४ तासात होणार, असे म्हटले नव्हते. रत्नागिरीत जो कार्यक्रम करुन दाखवला, ती झलक होती, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार? पुढे बोलताना म्हणाले, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार, यावर मी ठाम आहे. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व ठाकरें पेक्षा भावनाशील आहे, असे अनेकांचे मत आहे, मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही गुवाहाटीला गेलो, पुन्हा मंत्री झालो. त्यांच्या राजकीय प्रवासात त्रास होईल असे कुठले कृत्य आमच्याकडून होणार नाही. इतरांनी आमच्यात भांडणे लावण्याचे बालिश राजकारण करु नये, अशा शब्दांत उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाचे 6 खासदारही शिंदे गटात प्रवेश करणार? मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.