कॅलिफोर्निया (अमेरिका) – कॅलिफोर्नियामध्ये भडकलेल्या वणव्यामुळे आता रौद्र रुप धारण केले असून अनेक घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे काही हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते आहे. अमेरिकेच्या बऱ्याच भागात पसरलेली उष्णतेची लाट अजूनही ओसरलेली नाही. आगामी काळात ही उष्णतेची लाट अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
योसेमिते नॅशनल पार्कच्या जवळ भडकलेल्या या वणव्याला विझवण्यासाठी सुमारे 2 हजार फायर फायटर सक्रिय आहेत. त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टरदेखील तैनात करण्यात आली आहेत, असे कॅलिफोर्नियाच्या वन आणि संरक्षण विभागाने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी भडकलेला हा वणवा आता 14 हजार 200 एकरच्या क्षेत्रात पसरला आहे. या आगीमध्ये या परिसरातील सर्व वनसंपदा जळून खाक झाली आहे. या वणव्यामुळे आणि प्रचंड उष्णतेमुळे या राष्ट्रीय उद्यानात आगामी काळात मोठा दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
या राष्ट्रीय उद्यानाजवळच्या बहुतेक गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून हजारो नागरिकांना सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 6 हजार नागरिकांना स्थलांतर कारायला लागले आहे. आतापर्यंत 10 घरे जळून खाक झाली आहेत. तर आणखीन 5 घरांना या आगीचा धोका आहे. तर हजारो अन्य घरांनाही या आगीपासून धोका आहे.