Wild Boar Attack – आणे शिवारातील डोंगरावर शेळ्या चारत असताना अचानक समोर आलेल्या रानडुकराने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (दि. ३१ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात इंदूबाई शांताराम जाधव (वय ४२, रा. गुंळूचंवाडी) या गंभीर जखमी झाल्या असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेहमीप्रमाणे इंदूबाई जाधव या डोंगरात शेळ्या चारत असताना झुडपात लपून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या ओरडण्याने परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावले आणि त्यांना तत्काळ बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बांगर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर वनपाल नीलम ढोबळे व वनरक्षक विश्वराज सोळुंके यांनी जखमी महिलेला अधिक उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे.या घटनेमुळे आळेफाटा, वडगाव आनंद, राजुरी, उंच खडक, बांगरवाडी आणि आणे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून मका पिकाचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. पिकांच्या राखणीसाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर रानडुकरे थेट धावून येत असल्याचे अनुभव अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहेत. तातडीने उपाययोजना कराव्यात… आता पीक वाचवायचे की स्वतःचा जीव? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. वनविभागाने या वाढत्या उपद्रवाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी शंकर शिंदे, सचिन देशमुख आणि दिनकर आहेर यांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.