पुणे | कौटुंबिक वादातून पत्नीचा लाॅजमध्ये खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री कात्रज परिसरात उघडकीस आली. लाॅजच्या खोलीला कडी लावून आरोपी पसार झाला.
काजल कृष्णा कदम ( २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काजल आणि कृष्णा मजुरी करतात. त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होते. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी दुपारी दोघेजण सातारा रस्त्यावरील अश्विनी लाॅजमध्ये आले. दोघांनी लाॅजमधील खोलीत मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. कृष्णाने चाकूने तिचा गळा चिरला. त्यानंतर लाॅजच्या खोलीला बाहेरून कडी लावून तो पसार झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
लाॅजमधून पसार झालेल्या कृष्णाने या घटनेची माहिती मित्राला दिली. मित्राने याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा काजल लाॅजमधील खोलीत मृतावस्थेत सापडली. पसार झालेल्या कृष्णाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.




