पुणे | कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोणीकंद येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. यानंतर पती दिवसभर मद्यपान करुन घरातच झोपला होता. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केले आहे.
लक्ष्मीबाई बाबासाहेब जाधव (४४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर बाबासाहेब जाधव (५४, रा. बुर्केगाव) असे आरोपीचे नाव आहे. बाबासाहेब याचा वेल्डिंग व्यवसाय आहे. तर लक्ष्मीबाई एका कंपनीत कामाला जात होत्या. बाबासाहेब लक्ष्मीबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनेकदा मारहाण करायचा.
दरम्यान, सोमवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला. यानंतर तो मद्यपान करुन घरातच झोपला. दरम्यान, लक्ष्मीबाई आणि तिची विवाहित मुलगी एकाच कंपनीत काम करतात.
लक्ष्मीबाई घरुन निघताना नेहमी मुलीला फोन करायची. मात्र, मंगळवारी ती कंपनीत कामाला आली नाही. तसेच फोनही उचलत नव्हती. यामुळे दुपारी मुलगी घरी आली. तेव्हा घराचा दरवाचा आतून बंद होता.
यामुळे मुलीने घराचा दरवाजा ढकलून तोडला. तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेली दिसली तर वडील शेजारीच नशेत झोपलेले दिसले. तिने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.




