अमेरिकेने मित्रराष्ट्रांवर लावला प्रचंड टॅरिफ, मात्र रशिया-उत्तर कोरियाला वगळले? कारण काय? वाचा

Donald Trump Tariff Announcement | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टॅरिफचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी भारत, चीनसह अनेक देशांवर ‘सवलतीच्या रेसिप्रोकल टॅरिफ’ची (Discounted Reciprocal Tariff) घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जगभरातील बाजारात खळबळ माजली असून यामुळे व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, एकीकडे जगातील जवळपास सर्वच प्रमुख देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्यात आला असताना, रशिया आणि उत्तर कोरियाला यातून सूट देण्यात आली आहे. यामागचे नक्की कारण काय? समजून घेऊया.
भारताला झटका, चीनला दुहेरी मार
ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २६% टॅरिफ लावला आहे. यासोबतच चीनवर दुहेरी कारवाई करत ३४% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी चीनवर २०% टॅरिफ लावला होता, त्यामुळे आता चीनवर एकूण ५४% टॅरिफ लागू होणार आहे.
या धोरणात ट्रम्प यांनी जपान, दक्षिण कोरिया आणि भारत यांसारख्या मित्र आणि व्यापारी भागीदारांवर मोठा टॅरिफ लावला आहे, तर रशिया आणि उत्तर कोरियाला यातून वगळले आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरणानुसार हे पाऊल उचलले गेले आहे,. मात्र, यात मित्र राष्ट्रांवर प्रचंड टॅरिफ लागू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे उत्तर कोरिया आणि रशियाला वगळण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी भारत (२६%), दक्षिण कोरिया (२५%), जपान (२४%) आणि तैवान (३२%) वर मोठा टॅरिफ लावला आहे. तर, रशिया, उत्तर कोरिया आणि बेलारूसवर कोणताही टॅरिफ लावलेला नाही. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या जवळच्या मित्र राष्ट्रांपैकी एक असलेल्या इस्रायलवर १७% टॅरिफ लावण्यात आला आहे, तर अमेरिकेचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इराणवर केवळ १०% टॅरिफ आहे.
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशिया आणि इतर देशांवर टॅरिफ न लावण्याचे कारण हे आहे की हे ते आधीपासूनच अनेक निर्बंधांना सामोरे जात आहेत. युक्रेन युद्धामुळे रशिया आणि अमेरिकेतील व्यापार जवळपास थांबला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, आकडेवारीनुसार अमेरिका अजूनही रशिया, इराण आणि उत्तर कोरियासोबत मर्यादित प्रमाणात व्यापार करत आहे. 2024 मध्ये, एकूण अमेरिका-रशिया व्यापार 3.5 बिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये अमेरिकेची निर्यात 526.1 मिलियन डॉलर आणि उर्वरित रशियाकडून आयात करण्यात आली.
2023 मध्ये अमेरिकेने इराणला 59 मिलियन डॉलर किंमतीच्या वस्तू निर्यात केल्या, ज्यात वैद्यकीय उपकरणे, लस आणि फार्मा उत्पादने यांचा समावेश होता. इराणने अमेरिकेला सुमारे 2.2 मिलियन डॉलरची उत्पादने निर्यात केली. तसेच, 2024 मध्ये, अमेरिकेने उत्तर कोरियाला 1.5 मिलियन डॉलर किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार हा आकडेवारीनुसार खूपच कमी आहे.





