शैक्षणिक वर्षाची लगीनघाई कशासाठी?

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना शालेय शिक्षण विभागाला 15 जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची घाई झाली आहे. याबाबतची तयारीही शासनस्तरावर काही दिवसांपासूनच सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्षाची नियमावलीही शासनाकडून एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
कृती आराखडा तयार करणे सुरू
शालेय शिक्षण विभागाने शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्याशी चर्चा करुन टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत कृती आराखडा तयार केला आहे.
पालक, शिक्षकांच्या सूचनांचा विचार होणार का?
दरवर्षी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात येते. यंदा या दिवसापासून शाळा सुरू करणे शक्य नाही. शाळा लवकर सुरू करण्यास पालक, शिक्षक, कर्मचारी संघटना यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, या विरोधाचा शासनस्तरावर फारसा विचार केला जाईल की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
सुरक्षा आवश्यकच…
शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित भागात एक महिना आधी कोणताही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही याची खात्री करुनच शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. सामजिक अंतर, मास्क वापरणे, शाळांचा परिसर स्वच्छ ठेवणे आदीसह इतर सर्वच खबरदारींच्या उपायांची अंमलबजावणी शाळांना करावीच लागणार आहे. यंदा शासन ऑनलाइन शिक्षण देण्यालाच प्राधान्य देत असून वर्गनिहाय नियमावलीही तयार करण्यात आलेली आहे.
असे असू शकते नियोजन…
जुलैपासून इयत्ता नववी, दहावी, बारावीचे वर्ग, ऑगस्टपासून सहावी ते आठवीचे वर्ग, सप्टेंबरपासून पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावीच्या निकालावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आणि त्यानंतर वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
शाळा कधी व कशा सुरू करायच्या याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर निर्णयासाठी प्रलंबित आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी शाळांना योग्य त्या सूचना देण्यात येतील
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त.





