पंजाबच का, दिल्ली का नाही? स्थलांतरितांचे विमाने अमृतसरला उतरण्यावरून भगवंत मान यांचा मोदीला सवाल

चंदीगड : अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आणखी एक अमेरिकन विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात दाखल झाले आहे. हे विमानही पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. आता याच मुद्द्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारे विमान अमृतसरमध्ये कोणत्या निकषांवर उतरवले जात आहे, असा सवाल भगवंत मान यांनी केला आहे. मान यांनी केंद्र सरकारवर पंजाबी लोकांना बदनाम करण्याचा आरोप केला आहे. पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या परदेशी नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु भारत सरकारने पहिले विमान अमृतसरमध्ये उतरवले. यापैकी ३३ जण गुजरातचे, ३३ जण हरियाणाचे आणि ३० जण पंजाबचे होते. त्यांनी पहिले विमान अमृतसरमध्ये कोणत्या निकषांवर उतरवले हे मला माहित नाही.
आता ते म्हणत आहेत पुढचे विमानही अमृतसरमध्ये उतरेल, पण असे का? केंद्र सरकारने अमृतसरमध्ये विमान उतरवण्याचे निकष सांगावेत. अमृतसरची निवड का केली जात आहे हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट करावे. पंजाबी लोकांना बदनाम करण्यासाठी हे केले जात आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की हे सर्व फक्त पंजाबी लोकच बेकायदेशीरपणे परदेशात जातात असे भासवण्यासाठी घडत आहे, तर गुजरातमधील लोकही त्याच पद्धतीने परदेशात जात आहेत.
गेल्या वेळी, परदेशातून परतलेल्यांमध्ये त्यांच्या मुलांसह गुजराती लोक होते. आता प्रश्न असा उद्भवतो की गुजरातमधील लोकांना त्यांच्या मुलांसह परदेशात जाऊन तिथे स्थायिक होण्यास का भाग पडते आहे? गुजरातमधून परतलेल्या स्थलांतरितांच्या मुलाखती दाखवल्या जात नाहीत तर पंजाबमधील तरुणांच्या मुलाखती दाखवल्या जातात.





