Pune District : मार्वल इन लॉजिंगचा मालक अजूनही मोकाट का? पोलिसांच्या कथित आर्थिक तडजोडीच्या चर्चेने संशय गडद
Pune District : तरुणीला नशा आणणारी पांढऱ्या रंगाची पावडर देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्यावर अनेक जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले.

शिरूर : शिरूर शहरातील बहुचर्चित काळे कारनामे करणारे मार्वल इन लॉजिंग गंभीर प्रकरणांमुळे चर्चेत आले असताना, या प्रकरणात लॉजिंगच्या मालकाची भूमिका अद्याप तपासाच्या कक्षेत का आणली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एका तरुणीवर नशेची पावडर देऊन अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांपासून ते याच लॉजिंगमध्ये अमली पदार्थ जप्त झाल्याच्या पोलिस कारवाईपर्यंत घटनांची मालिका समोर आली आहे. तरीही लॉजिंग मालकावर अद्याप आरोपी म्हणून कारवाई का नाही? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
तरुणीला नशा आणणारी पांढऱ्या रंगाची पावडर देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्यावर अनेक जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे ही पावडर नेमकी कोणती होती, ती कोणी आणली, तिचा पुरवठा कोणी केला आणि ती लॉजिंगपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
धक्कादायक बाब म्हणजे याच लॉजिंगमध्ये काही दिवसांपूर्वी मेफेड्रॉनसदृश अमली पदार्थ जप्त झाल्याची पोलिस कारवाई झाली होती. एका बाजूला अमली पदार्थांवर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला त्यानंतर काही दिवसांत नशेची पावडर देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप समोर येणे, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास झाला आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.
लॉजच्या खोल्यांचा गैरप्रकारांसाठी वापर होत असल्याची माहिती व्यवस्थापनाला होती का? खोली कोणी बुक केली? संबंधित व्यक्तींची ओळखपत्रे तपासण्यात आली होती का? प्रवेश-निर्गमन रजिस्टरमध्ये कोणत्या नोंदी आहेत? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसते? संबंधित वाहनांची माहिती काय आहे? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे. अमली पदार्थ प्रकरण आणि अत्याचार प्रकरण अशा दोन गंभीर घटनांनंतरही लॉजिंगच्या मालकाची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांच्या तपासाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, लॉजिंग मालकाला आरोपी न करण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्यामार्फत मोठ्या आर्थिक रकमेची मागणी अथवा तडजोड झाल्याची चर्चा असल्याचा दावा काही सूत्रांकडून केला जात आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, मालकावर अद्याप कारवाई का झाली नाही, यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा खरी की खोटी, हे पोलिस प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. जर आर्थिक तडजोडीचा आरोप खोटा असेल तर त्याचे खंडन करावे; आणि आरोपात तथ्य असेल तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लॉजिंग मालकाच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अद्याप मालकावर आरोपी म्हणून कारवाई झालेली नाही. त्यामुळे ‘आरोपी करणार’ या आश्वासनापलीकडे तपास कधी पुढे जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
एका लॉजमध्ये अत्याचाराचे प्रकरण समोर येते, त्याच ठिकाणी अमली पदार्थ जप्त होतात आणि तरीही व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित होत नसेल, तर अशा ठिकाणी सुरू असलेल्या कारभाराला नेमके कोणाचे संरक्षण आहे? असा संतप्त सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी. लॉजचे सीसीटीव्ही फुटेज, ग्राहकांचे रजिस्टर, ओळखपत्रांच्या नोंदी, बुकिंगची माहिती, कर्मचारी व व्यवस्थापनाची भूमिका, अमली पदार्थांचा स्रोत तसेच संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
अत्याचाराचे आरोप आणि अमली पदार्थांची कारवाई एकाच लॉजिंगशी संबंधित असल्याने हा केवळ एका गुन्ह्याचा तपास न राहता संपूर्ण यंत्रणेची कसोटी ठरली आहे. मालक दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे; मात्र दोष नसल्यास तेही पोलिसांनी पुराव्यांसह स्पष्ट करावे. तपासावर संशय निर्माण होईल अशी परिस्थिती राहू नये, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.





