‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना भाजप नेते गप्प का?’

औरंगाबाद – सतत चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं ? वादग्रस्त प्रश्न राज्यपाल यांनी जाहीर कार्यक्रमात उपस्थित केला. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख केल्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.
भाजप मते मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करत असतो हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपचे नेते गप्प कसे बसतात, असा सवाल उपस्थित करून ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत, असे पटोले म्हणाले.





