…तर काँग्रेस एखाद्या मुस्लिम व्यक्तीला पक्षाचे अध्यक्ष का बनवत नाही?, पंतप्रधान मोदींची सडकून टीका

PM Modi Criticized Congress | हरियाणा येथे एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर संविधानाचा अनादर केल्याचा आरोप केला. मोदींनी वक्फ कायद्यांवरून काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच, मुसलमानांवर एवढे प्रेम आहे, तर मुस्लिम व्यक्तीला पक्षाचे अध्यक्ष का बनवत नाही? असा सवाल केला.
काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, काँग्रेसने कट्टरपंथी मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी 2013 मध्ये वक्फ कायद्यात सुधारणा केली होती. निवडणुका जिंकण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच असे करण्यात आले आणि हा असा कायदा होता की संविधानही त्याच्यासमोर कमकुवत झाले आणि त्यावर लागूही झाले नाही.
काँग्रेसला मुस्लिमांबद्दल इतकेच प्रेम असेल तर एखाद्या मुस्लिमाला पक्षाचे अध्यक्ष का बनवत नाही? निवडणुकीत काँग्रेस अर्ध्या जागा मुस्लिमांना का देत नाही?असा सवाल देखील त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने आणीबाणीत संविधानाची चिरफाड केली होती. सत्तेवर कसेबसे टिकून राहण्यासाठी काँग्रेसने आणीबाणीत संविधानाच्या भावनेला चिरडले. संविधानाची भावना आहे की, सर्वांसाठी न्याय व्हावा आणि समानतेच्या भावनेने काम व्हावे. संविधानाची भावना आहे की, सर्वांसाठी एकसारखी न्याय संहिता असावी, ज्याला मी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणतो. पण काँग्रेसने ती कधीच लागू केली नाही.
उत्तराखंडमध्ये भाजप सरकार आल्यानंतर धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू झाली. ती ठामपणे लागू करण्यात आली. देशाचे दुर्दैव पहा की, संविधानाला खिशात ठेवणारे लोक त्याचाही विरोध करतात. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारने कर्नाटकात निविदांमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण केले, ज्याची संविधानात तरतूद नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
जर मुस्लिमांबद्दल इतकेच प्रेम असेल तर काँग्रेसने त्यांच्या एखाद्या नेत्याला आपल्या पक्षाचे अध्यक्ष का बनवू नये? त्यांना निवडणुकीत अर्ध्या जागा का देऊ नयेत?, असा खरमरीत सवाल देखील त्यांनी केला.





