Health Alert : उन्हाळा की पावसाळा? अचानक आलेल्या अवकाळीने आजारांना निमंत्रण; ‘हे’ ५ धोके टाळा
Health Alert : हवामानातील बदलामुळे वातावरणात वाढली आर्द्रता; जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क.

Health Alert – मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले होते, तर उष्माघाताचा धोका देखील वाढला होता. मात्र, सोमवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला.
रखरखत्या उन्हानंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सोमवारी दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. आणि शहरातील काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या, तर काही भागात हलका पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे तापमानात घट झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.
त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.मात्र, या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात होणारे अचानक बदल आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. शरीराला अचानक उष्णतेतून थंड वातावरणात जुळवून घेणे कठीण जाते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
तसेच, पावसामुळे वाढलेली आर्द्रता ही जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. थंड-गरम अन्न टाळणे, पुरेसे पाणी पिणे, ओले कपडे लगेच बदलणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.एकीकडे अवकाळी पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला, तरी दुसरीकडे तो आरोग्यासाठी नवे आव्हान निर्माण करत आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात सजग राहणे गरजेचे आहे.





