jayant patil : माझ्यासारख्या गरिबाला का सारखं वेठीस धरता? जयंत पाटलांचा सवाल

jayant patil : तुम्ही माय बाप आहात. तुम्ही जे चालवणार तेच चालणार. परंतु मी इथेच आहे आणि पक्षाचा मेळावा घेत आहे. पण तरीही तुम्ही असं का करता? मला माहीत नाही. परंतु भाजपा हा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यासारख्या गरिबाला का सारखं वेठीस धरता? असा सवाल करताना राष्ट्रवादी कॊग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा खोडून काढला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षातील भूमिकेवरून युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याचपार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी शरद पवारांकडे केली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते सत्ताधाऱ्यांना भेटू शकत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी सर्व चर्चा थांबवण्याची विनंती केली. तसेच पक्षांतरासाठीच भेटलो असेल, असा गैरसमज करून घेऊ नका. कारण तुम्ही बातमी चालवता, त्यामुळे मला प्रसिद्धी मिळते आणि माझीही कामे होतात, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी माध्यमांना लागावला.





