Bihar Assembly Election: जेपी नड्डा बिहारला आले पण नीतीश कुमारांना न भेटताच दिल्लीला परतले; राजकीय चर्चांना उधाण

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जागावाटपाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पटना येथे दौरा केला, परंतु जदयुचे नेते व मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी भेट न घेताच ते दिल्लीला परतले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नड्डांचा पटना दौरा आणि कोअर कमिटीची बैठक –
पटना येथे जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाचे संघटन महासचिव बीएल संतोष, प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएला बळकट करण्यावर आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात आला, अशी माहिती दिलीप जायसवाल यांनी दिली.
नीतीश कुमारांशी भेट का रद्द?
जेपी नड्डा यांची नीतीश कुमार यांच्याशी भेट नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांची प्रकृती ठीक नसल्याने ही भेट रद्द झाली. विशेष म्हणजे, 10 सप्टेंबरनंतर नीतीश कुमार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे नड्डा यांना त्यांच्याशी चर्चा न करता दिल्लीला परतावे लागले. ही भेट महत्त्वाची मानली जात होती, कारण निवडणूक आयोग ऑक्टोबरच्या सुरुवातीला बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर एनडीएत समन्वय साधण्यासाठी ही भेट गरजेची होती.
जागावाटपाचा तिढा कायम
एनडीएत जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि जदयु जवळपास समान जागांवर लढण्याची तयारी करत आहेत, परंतु नीतीश कुमार यांचा जदयु पक्षाला भाजपपेक्षा किमान एक जागा जास्त हवी आहे. दुसरीकडे, लोजपा (राम विलास) 40 जागांची मागणी करत आहे, तर जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांनी 18-20 जागांची मागणी केली आहे. यामुळे जागावाटपाचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनडीएच्या तयारीची समीक्षा –
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी विधानसभा स्तरावरील एनडीएच्या सम्मेलनांची समीक्षा केली आणि कोणत्याही समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश दिले. एनडीए सरकारने प्रत्येक समस्येचे समाधान केल्याची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचली असून, हा सकारात्मक संदेश आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, एनडीए कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विकासकामांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. जागावाटपाचा मुद्दा एनडीएच्या शीर्ष नेत्यांच्या बैठकीत अंतिम होईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
राजकीय चर्चांना उधाण –
जेपी नड्डा यांच्या नीतीश कुमारांशी भेट न झाल्याने आणि जागावाटपाचा तिढा कायम असल्याने बिहारच्या राजकारणात नवे कयास बांधले जाऊ लागले आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावरून खेचाखेची दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना हे प्रश्न कसे सुटणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





