Muralidhar Mohol | लंडनहून मुंबईला निघालेले व्हर्जिन अटलांटिकचे विमान (व्हीएस३५८) एका प्रवाशाला तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज भासल्याने तुर्कीतील दियाबाकीर लष्करी विमानतळावर उतरले. मात्र, या छोट्या विमानतळावर हार्ड लँडिंगमुळे विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाला. सुविधांचा अभाव आणि मर्यादित संपर्क साधनांमुळे भारतीय प्रवासी अडकून पडले. या विमानतळावर फक्त लहान व्यावसायिक आणि लष्करी विमानेच उड्डाण करतात, त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. प्रवाशांच्या नातेवाईकांनी नागरी उड्डाण व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत मदत मागितली. मोहोळ यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी व्हर्जिन अटलांटिक, हवाई खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय साधला. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हवाई मंत्रालयाने विशेष पथक नियुक्त केले, तर परराष्ट्र मंत्रालय आणि तुर्कीतील भारतीय राजदूताचीही मदत घेतली गेली. प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, अन्नपाण्याची सोय, गर्भवती महिलांची काळजी आणि लहान मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वैद्यकीय सेवाही पुरवली गेली. दरम्यान, व्हर्जिन अटलांटिकने लँडिंग गियर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. कंपनीने लंडनहून नवीन विमान पाठवले, परंतु तुर्की सरकार आणि लष्कराने उतरण्यास परवानगी नाकारल्याने ते परत फिरले. भारतीय हवाई खात्याच्या पाठपुराव्यामुळे तुर्की सरकारने प्रवाशांना तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा आणि हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली. मोहोळ यांनी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवत तांत्रिक परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर, शुक्रवारी रात्री ८:३० वाजता व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने प्रवासी तुर्कीतून मुंबईला रवाना झाले आणि सुखरूप पोहोचले. या संपूर्ण घटनेची माहिती मोहोळ यांनी त्यांच्या एक्स पोस्टद्वारे दिली.