पुणे | अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत असलेले दोन मित्र कागदोपत्री उल्लेखा मध्ये का नाहीत ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत असलेल्या दोन मित्रांचा उल्लेख कागदपत्रात का नाही? त्याच्या बरोबर पार्टीत असलेल्या सर्व मुलांना अटक होणे आवश्यक होते, ते का झाले नाही? त्यांची नावे का घोषित केली नाहीत? असे मुद्दे ऍड सत्या मुळे यांनी उपस्थित केले आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. आनंद दवे यांच्या वतीने ऍड सत्या मुळे यांनी न्यायालयात या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली असून, न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
दरम्यान, भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल,कोझी व ब्लॅक पबचे मालक आणि कर्मचारी यांची शुक्रवारी(दि. २४) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या याचिकेवर देखील सुनावणी झाली असून,न्यायालयीन कोठडीत देखील आरोपींची सखोल चौकशी होऊ शकते असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या याचिकेसंबंधी माहिती देताना ऍड सत्या मुळे म्हणाले,अल्पवयीन मुलाने जिथे मद्यप्राशन केले होते.
त्या पब मधील काही ग्राहकांचे जवाब नोंदविणे आवश्यक होते ते का घेतले नाहीत ?बार च्या मालकांना अटक का होत नाहीये? ज्या नागरिकांनी त्याला मारहाण केली त्यांचे पण जवाब आवश्यक होते ते का झाले नाहीत? हे मुद्दे पोलिसांनी विचारात घेतले नाहीत. उद्या जर न्यायालयात अल्पवयीन मुलाने सर्व गोष्टी नाकारल्या तर या वरील गोष्टी पुरावा म्हणून आवश्यक आहेत.
याची पोलिसांना पण कल्पना आहे.पण नंतर हे प्रकरण कमजोर होण्यासाठी आधीच या काळजी घेतल्या आहेत की काय अशी शंका येते.मी कार्ड ने पेमेंट केले म्हणजे मीच त्यातील सर्व पदार्थ सेवन केले असा अर्थ होत नाही अशी भूमिका तो घेऊ शकतो.
सलमान च्या प्रकरणासारखे बदली ड्राइव्हर उपस्थित करणे खूप अवघड गोष्ट त्याच्या साठी नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला त्याच्या जन्म दाखल्यावर सुद्धा अविश्वास आहे. या मुद्द्यांसाठी सखोल तपास होणे आवश्यक असल्याने आम्ही ही याचिका दाखल केली आहे.




