Matcha Tea: चहा-कॉफी सोडून माचा टीकडे का वळतायत लोक? जाणून घ्या या ग्रीन ड्रिंकची खासियत आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Matcha Tea स्ट्रॉबेरी माचा, मँगो माचा, कोकोनट माचा आणि डर्टी माचा अशा वेगवेगळ्या प्रकारांमुळे या पेयाची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

Matcha Tea: सध्या सोशल मीडियावर फूड आणि लाइफस्टाइलशी संबंधित व्हिडीओ पाहताना ‘माचा टी’ किंवा ‘माचा लाटे’ हा प्रकार वारंवार पाहायला मिळतो. स्ट्रॉबेरी माचा, मँगो माचा, कोकोनट माचा आणि डर्टी माचा अशा वेगवेगळ्या प्रकारांमुळे या पेयाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. कॅफेमध्ये मिळणारा हा ट्रेंड आता अनेकांच्या घरातील किचनपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात भारतात ‘How to make matcha’ या शोधाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही सांगितले जात आहे.
माचा म्हणजे नेमकं काय? (Matcha Tea)
माचा हा जपानी पद्धतीचा खास ग्रीन टी पावडर प्रकार आहे. सामान्य ग्रीन टी बनवताना चहाची पानं गरम पाण्यात टाकून त्यातील अर्क घेतला जातो. त्यानंतर पानं गाळून बाजूला काढली जातात. मात्र, माचामध्ये चहाची पानं बारीक करून त्याची पावडर तयार केली जाते. ही पावडर थेट पाण्यात किंवा दुधात मिसळून प्यायली जाते. त्यामुळे माचा आणि नेहमीची ग्रीन टी यामध्ये फरक आहे.
माचाची चव कशी असते? (Matcha Tea)
माचाची चव सामान्य चहा किंवा ग्रीन टीपेक्षा वेगळी असते. त्यात थोडी गवतासारखी, मातीसारखी चव जाणवू शकते. काही प्रकारांमध्ये किंचित कडवटपणाही असतो. त्यामुळे पहिल्यांदा माचा पिणाऱ्या अनेकांना तो थोडा वेगळा वाटू शकतो. ही चव सौम्य करण्यासाठी माचा पावडर दूध आणि थोड्या गोड पदार्थासोबत घेण्याचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे माचा लाटे हा प्रकार सध्या लोकप्रिय झाला आहे.
माचा इतका ट्रेंडमध्ये का आला?
माचा फक्त एक पेय राहिलेला नाही. त्यापासून वेगवेगळे फ्लेवर्स आणि ड्रिंक्स तयार केले जात आहेत. मँगो माचा आणि स्ट्रॉबेरी माचा यांसारख्या प्रकारांच्या शोधातही वाढ झाल्याचं सांगितलं जातं. विशेषतः सोशल मीडियावर माचाचे हिरवेगार रंग आणि त्यापासून तयार होणारे आकर्षक ड्रिंक्स यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. अनेक कॅफेमध्ये माचा लाटेपासून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे माचा ड्रिंक्स उपलब्ध आहेत.

Iced Matcha Latte
माचामध्ये कॅफीन असतं का?
हो, माचामध्ये कॅफीन असतं. त्यामुळे माचा हा पूर्णपणे कॅफीनमुक्त पर्याय नाही. त्याचं सेवन करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः कॅफीनबाबत संवेदनशील असणाऱ्या व्यक्तींनी त्याचं प्रमाण लक्षात घेऊन सेवन करावं. माचा घेताना त्यात किती पावडर वापरली आहे, हेही महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा माचा घेत असाल तर कमी प्रमाणापासून सुरुवात करणं योग्य ठरू शकतं.
माचा हेल्दी आहे का?
माचामध्ये पॉलीफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. मात्र, माचा किती आरोग्यदायी ठरेल हे तो कशा पद्धतीने घेतला जातो, यावरही अवलंबून असतं. त्यात मोठ्या प्रमाणात साखर, फ्लेवर्ड सिरप किंवा व्हिप्ड क्रीम घातल्यास पेयातील साखर आणि कॅलरी वाढू शकतात. त्यामुळे रोजच्या सेवनासाठी माचा साध्या पद्धतीने घेणं चांगलं. आपल्या आहाराचा एकूण विचार करणंही महत्त्वाचं आहे.
घरच्या घरी असा बनवा माचा लाटे
माचा लाटे बनवण्यासाठी एक छोटा चमचा माचा पावडर, दोन ते तीन चमचे कोमट पाणी, 150 ते 200 मिली दूध, चवीनुसार थोडं मध आणि काही बर्फाचे तुकडे घ्या. सर्वप्रथम कपमध्ये माचा पावडर घ्या. त्यात थोडं कोमट पाणी घालून चांगलं फेटा. पावडरच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि वर हलका फेस तयार होईल, अशा पद्धतीने फेटणं गरजेचं आहे. यानंतर त्यात गरम किंवा थंड दूध घाला. चवीनुसार थोडा मध घालू शकता. थंड माचा लाटे हवं असल्यास त्यात बर्फाचे तुकडे घाला.
मात्र, माचा बनवताना खूप गरम पाणी वापरू नका. पहिल्यांदा माचा लाटे बनवत असाल, तर कमी पावडर वापरून सुरुवात करा. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ट्रेंडिंग माचा लाटेचा आनंद घेता येईल.





