Sabudana Rasmalai: उपवासासाठी बनवा हटके साबुदाणा रसमलाई; चव अशी की नेहमीची रसमलाईही विसराल!
Sabudana Rasmalai साबुदाणा रसमलाई बनवण्यासाठी फार काही साहित्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही रेसिपी तयार करता येते.

Sabudana Rasmalai: रसमलाई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती मलाईदार, थंडगार आणि केशर-इलायचीच्या सुगंधाने भरलेली मिठाई. पण तुम्हाला नेहमीच्या रसमलाईपेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर साबुदाणा रसमलाई नक्की करून पाहा. विशेष म्हणजे उपवास किंवा व्रताच्या दिवसांमध्येही ही रेसिपी करता येते. साबुदाण्यापासून तयार केलेले मऊ गोळे आणि त्यात मिसळलेलं घट्ट, केशरयुक्त दूध यामुळे ही मिठाई चवीला अगदी शाही लागते.
साबुदाणा रसमलाई बनवण्यासाठी फार काही साहित्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही रेसिपी तयार करता येते. चला तर मग, पाहूया साबुदाणा रसमलाई बनवण्याची सोपी पद्धत.
साबुदाण्याचे गोळे बनवण्यासाठी साहित्य (Sabudana Rasmalai)
यासाठी एक कप साबुदाणा, २ ते ३ चमचे दूध, १ ते २ चमचे पिठीसाखर, २ चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा तूप लागेल.
रबडीसाठी लागणारे साहित्य
रबडीसाठी एक लिटर फुल क्रीम दूध, ४ ते ५ चमचे साखर, ३ ते ४ वेलची, ८ ते १० केशराच्या काड्या, ८ ते १० बदाम, ८ ते १० काजू आणि एक चमचा पिस्ता घ्या.
साबुदाणा भिजवून घ्या
सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. साबुदाणा आणि पाण्याचं प्रमाण जवळपास समान ठेवा. साबुदाणा व्यवस्थित फुगल्यानंतर त्यापासून गोळे तयार करणं सोपं जातं.
रसमलाईचे गोळे कसे बनवायचे?
भिजवलेला साबुदाणा एका भांड्यात घ्या. त्यात पिठीसाखर आणि मिल्क पावडर घाला. हे मिश्रण हाताने चांगलं मॅश करून एकत्र करा. त्यानंतर हाताला थोडं तूप लावून मिश्रणाचे छोटे-छोटे भाग घ्या. प्रत्येक भागाचा गोल गोळा तयार करा आणि त्याला हलकं चपटं करा. गोळे फार मोठे ठेवू नका. कारण शिजल्यानंतर त्यांचा आकार थोडा वाढतो.

Sabudana Rasmalai: उपवासासाठी बनवा हटके साबुदाणा रसमलाई; चव
आता तयार करा केशरयुक्त दूध (Sabudana Rasmalai)
रसमलाईसाठी एका जाड बुडाच्या भांड्यात एक लिटर दूध घ्या आणि ते उकळायला ठेवा. दूधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. दूध तळाला लागू नये म्हणून ते अधूनमधून हलवत राहा. दूध थोडं घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि कुटलेली वेलची घाला. त्यानंतर केशर दूधात मिसळा. यामुळे रसमलाईला सुंदर रंग आणि छान सुगंध येईल.
साबुदाण्याचे गोळे शिजवा (Sabudana Rasmalai)
आता तयार केलेले साबुदाण्याचे गोळे हळूहळू गरम दूधात सोडा. गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा आणि गोळे साधारण ८ ते १० मिनिटे शिजू द्या. गोळे मऊ आणि थोडे पारदर्शक दिसू लागले की ते शिजले आहेत, असं समजावं. यानंतर त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ता घाला. आणखी २ ते ३ मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा.
थंड करून करा सर्व्ह
साबुदाणा रसमलाई थोडी थंड होऊ द्या. त्यानंतर ती २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना वरून पिस्ता आणि केशर घाला. थंडगार साबुदाणा रसमलाई खायला दिल्यानंतर घरातील प्रत्येकाला ही हटके मिठाई नक्की आवडेल.
व्रताच्या दिवसांमध्ये गोड पदार्थ खायची इच्छा असेल आणि नेहमीच्या साबुदाणा खिचडी किंवा थालीपीठापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर ही रेसिपी करून पाहता येईल.





