Mahadev Munde : १८ महिन्यानंतरही छडा लागेना! महादेव मुंडे प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

Mahadev Munde Case : बीड जिल्हा गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आधीच खळबळ माजवलेली असताना, परळीतील व्यापारी आणि पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय दबावाची चर्चा सुरु झाली आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोर झालेल्या या हत्येचा तपास 18 महिन्यांनंतरही थंड आहे. यामुळे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचा संयम सुटला आहे.
काय आहे महादेव मुंडे हत्या प्रकरण?
महादेव मुंडे हे बीडमधील परळी येथील स्थानिक व्यापारी आणि पिग्मी एजंट होते. ते लोकांच्या घरी जाऊन पिग्मीचे पैसे गोळा करत आणि ते बँकेत जमा करत असायचे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची परळी येथील तहसील कार्यालयासमोर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सापडला.
शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या गळ्यावर 20 सेंमी लांब आणि 3 सेंमी खोल वार, तसेच मान, हात, पाठ आणि गालावर 16 जखमा आढळल्या आहेत. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातुन समोर आली आहे. मुंडे यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांच्याकडील सुमारे सव्वा लाख रुपयांचे पिग्मी कलेक्शन, मोबाईल, अंगठी आणि लॉकेट लांबवले.
12 गुंठे जमिनीच्या वादातून हत्या?
भाजप आमदार सुरेश धस यांनी या हत्येमागे 12 गुंठे जमिनीच्या वादाचे कारण असल्याचा दावा केला आहे. त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सुशील कराड यांच्यावर थेट आरोप केले आहेत. सुरेश धस यांच्या मते, या हत्येत स्थानिक गुंड टोळीचा हात आहे, आणि बीड पोलीस दलातील काही अधिकारी या टोळीला पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप धस यांनी केला आहे.
मांस, हाड, रक्त वाल्मिक कराडच्या कार्यालयात : बाळा बांगर
अलीकडेच वाल्मिक कराडचे माजी सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा बांगर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले कि, हत्येनंतर महादेव मुंडे यांचे मांस, हाड आणि रक्त वाल्मिक कराडच्या कार्यालयात टेबलवर ठेवण्यात आले होते. याशिवाय, शिवराज बांगर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे.
महादेव मुंडे प्रकरण चर्चेत का आहे?
वाल्मिक कराडचे माजी सहकारी बाळा बांगर यांनी हत्येच्या क्रूरतेचा खुलासा करत वाल्मिक आणि त्याच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी कराडच्या कार्यालयात महादेव यांचे अवशेष पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
तसेच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 16 जुलै 2025 रोजी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तपास वेगाने न झाल्याने ज्ञानेश्वरी यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी पोलिसांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर तपासाला गती मिळाली असून हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप एकही आरोपी पकडला नसल्याने त्यांच्यावरही दबाव वाढत आहे.
महादेव मुंडे प्रकरणाची तपासाची सध्याची स्थिती काय?
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत 196 जणांची चौकशी, 83 साक्षीदारांचे जबाब आणि 150 मोबाइल डेटाची तपासणी करण्यात आली आहे. तरी एकही आरोपी पकडला गेला नाही.
- या प्रकरणात आत्तापर्यंत आठ तपास अधिकारी बदलले गेले आहेत. सध्या डीवायएसपी अनिल चोरमले यांच्याकडे जबाबदारी आहे.
- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 25 जुलै 2025 पर्यंत विशेष तपास पथक (SIT) स्थापन न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
- ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.





