पंतप्रधानाच्या सुरक्षेच्याबाबत चूक नेमकी कोणाची याचा खुलासा होणे गरजेचे – नवाब मलिक

मुंबई – देशाचे पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आला. ही गंभीर बाब असून पंजाबमध्ये पंतप्रधान सुरक्षेच्याबाबत चूक नेमकी कोणाची याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षतेसाठी जी यंत्रणा तयार केली जाते त्यामध्ये एसपीजी, आयबी, आणि राज्याची पोलिस यंत्रणेचा समावेश असतो. ही घटना घडल्यानंतर अनेक राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या घटनेचे राजकारण होत असल्याची शंका मलिक यांनी व्यक्त केली आहे.
यात केंद्रीय यंत्रणेची अथवा राज्याच्या यंत्रणेची चूक झाली याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्राने केली तर राज्य सरकार याला चुकीचे सांगणार आणि राज्य सरकारवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, अशी परिस्थिती असताना निष्पक्षतेने खुलासा होणे गरजेचे आहे.
यासाठी न्यायलयीन प्रक्रियेद्वारे न्यायाधीशांच्या माध्यातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. यातूनच या घटनेबाबतची योग्य ती माहिती जनतेसमोर येईल,असेही नवाब मलिक म्हणाले.





