मुंबई – एनडीएच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 5 खासदारांमागे एक मंत्रिपद असा निकष असल्याचे म्हटले जात आहे. यात मंत्रिपदासाठी श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, शिवसेनेने एनडीए सरकारमध्ये १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळाले नाही. त्यामुळेच एनडीएमधील घटकपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे एनडीएचे घटकपक्ष टीडीपी, जेडीयू, लोक जनशक्ती पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी आपल्या मागण्या मांडण्यास सुरवात केली आहे. लोकसभा निवडणूकीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मावळ आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक्क्य घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी यामधील प्रतापराव जाधव यांचे नाव सुद्धा आघाडीवर असून धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एनडीएमध्ये कोणाला मंत्रिपद मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही एक जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या सात नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.