ओडिशात भाजप कोणाला देणार संधी? नव्या मुख्यमंत्री पदासाठी संबित पात्रांसह ‘ही’ नावे चर्चेत

Odisha News | ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. नवीन पटनायक सरकारची 24 वर्षांची सत्ता भाजपने बाजूला केली आहे. यानंतर आता ओडिशाचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज्यात 10 जून रोजी विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकतो.
सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काही नावे आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, लक्ष्मण बाग, भुवनेश्वरचे खासदार अपराजिता सारंगी, बालासोरचे खासदार प्रताप सारंगी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा, संबलपूर विधानसभेचे आमदार जय नारायण मिश्रा ही नावे ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
संबलपूर जिल्ह्यातील कुचिंदा येथील ज्येष्ठ आमदार रविनारायण नाईक यांनी सांगितले की, राज्य विधिमंडळ पक्षाची भुवनेश्वरमध्ये बैठक होईल आणि 10 जून रोजी भाजप सरकारच्या शपथविधी समारंभाच्या आधी नावाची घोषणा केली जाईल. संसदीय पक्ष शुक्रवारी नवीन मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून शनिवारी औपचारिक घोषणा केली जाईल.” Odisha News |
धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत आणि ते ओडिशातील संबलपूरचे खासदार देखील आहेत. ते 10 वर्षे केंद्रात मंत्री आहेत. मोदी सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2000 साली आमदार म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
2004 मध्ये ते देवगड, ओडिशाचे खासदार झाले. मात्र, 2009 मध्ये ते पल्लहरामधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी बिहार, ओडिशा, झारखंड, उत्तराखंड आणि कर्नाटकमधील निवडणूक प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
लक्ष्मण बाग
ओडिशाचे पाच वेळा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पराभव करणारे लक्ष्मण बाग हे नेते आहेत. त्यांनी बोलंगीर जिल्ह्यातील कांताबंजी विधानसभा जागा जिंकली आहे. पटनायक यांचा पराभव केल्यानंतर लक्ष्मण बाग हे रातोरात घराघरात प्रसिद्ध झाले. लक्ष्मण बाग ओडिशातील गरीब शेतकरी कुटुंबातील आहे. मजूर आणि ट्रक चालक म्हणून त्यांनी आयुष्य वेचले. पुढे त्यांनी स्वतःचा वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर राजकारणात नशीब आजमावण्याचा विचार केला. 2019 मध्ये ते काँग्रेसच्या उमेदवाराकडून केवळ 128 मतांनी पराभूत झाले. पण 2024 च्या निवडणुकीत त्यांनी नवा विक्रम रचला. Odisha News |
मनमोहन सामल
मनमोहन सामल हे ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील असून ते वकिल आहेत. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 1979 मध्ये शिक्षणादरम्यान त्यांची महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नंतर त्यांनी अभाविपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते दोन वेळा भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. 2004 मध्ये ते भद्रक जिल्ह्यातील धामनगरमधून आमदार म्हणून निवडून आले.
भाजप-बीजेडी युतीमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर ते नवीन पटनायक सरकारमध्ये मंत्री झाले. ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. ओडिशातील भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि ती पूर्ण केली.
बैजयंत पांडा
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा हेही या पदाचे प्रमुख उमेदवार आहेत. सहा वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांनी 2019 मध्ये केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, जिथे त्यांचा पराभव झाला. यानंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीजेडीच्या अंशुमन मोहंती यांचा 66,536 मतांनी पराभव केला.
तर पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा विजयी झाले आहेत. पात्रा यांनी बीजेडी उमेदवाराचा १,०४, ७०९ मतांनी पराभव केला. त्यांना बीजेडीच्या अरुप पटनायक यांच्याकडून कडवी झुंज दिली होती.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत 147 पैकी 78 जागांवर विजय मिळवला आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल बीजेडी सरकारचा पराभव केला. त्याच वेळी, पटनायक यांच्या बीजेडीला 51 जागा मिळाल्या, जे 74 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप मागे होते. Odisha News |
हेही वाचा:
चीननंतर भारत कॅनडासाठी धोकादायक; उच्चस्तरीय समितीने केला गंभीर आरोप





