एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? ‘ही’ नावं चर्चेत

N. Biren Singh: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंफाळ राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा सादर केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते पदावर कायम असतील. मात्र, अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मणिपूरचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप नवीन मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये गेल्याकाही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था लागू करण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन केले जाऊ शकते.
गेल्याकाही महिन्यांपासून मणिपूरमधील हिंसाचारामुळे विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. तसेच, राज्यात पक्षांतर्गत देखील विरोध वाढला होता. सिंह यांनी दिल्लीहून परतल्यानंतर अवघ्या काही तासातच राजीनामा दिला आहे. राज्यातील अनेक भाजप आमदार मुख्यमंत्री बदलण्यात यावा, अशी मागणी करत होते असे सांगितले जाते.
मुख्यमंत्रीपदासाठी ही नावं चर्चेत
भाजप नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, लवकरात लवकर नवीन नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदासाठी ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री युमनाम खेमचंद सिंह, ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री टी. विश्वजीत सिंह आणि विधानसभा अध्यक्ष टी. सत्यब्रत सिंह यांची नावं आघाडीवर आहेत.
दरम्यान, एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जवळजवळ दोन वर्षे भाजपचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मणिपूरचे विभाजन केले. ‘मणिपूरमध्ये हिंसाचार, जीवितहानी आणि भारताच्या कल्पनेचा नाश झाला असूनही, पंतप्रधान मोदींनी त्यांना पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली. एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यावरून असे दिसून येते की लोकांचा वाढता दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा तपास आणि काँग्रेसचा अविश्वास ठराव यामुळे त्यांना असे करण्यास भाग पाडले गेले, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांनी मणिपूरला भेट देऊन लोकांचे म्हणणे ऐकावे, असेही ते म्हणाले.



