महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होणार? केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे सूचक विधान…

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत
यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची नावे समोर येत आहेत. या सर्व तर्क-वितर्कांवर केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे केंद्रातील नेते ठरवतील, असे सुचक विधान केले आहे.
महाराष्ट्रातल्या मनातल्या मुख्यमंत्र्यांबाबत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील किंवा देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची नावं घेतली जात आहेत. तुमच्या मते महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? असं विचारले असता कराड म्हणाले, महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्र्याबद्दलच्या चर्चा प्रिंट आणि टेलिव्हिजन माध्यमांत सुरू आहेत. हे सगळे करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करणे गरजेचे आहे.
2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकास करणारा मुख्यमंत्री पाहिजे, हे सर्व केंद्रातील नेते ठरवतील. केंद्रातील नेते जे काही ठरवतील त्याला महत्त्व आहे. केंद्राबरोबर राज्य चालले पाहिजे आणि केंद्राबरोबर राज्याचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे केंद्रातील नेते ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल, असेही कराड यांनी म्हटले आहे.





