‘भाजप’च्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी ‘या’ तीन नावांची चर्चा तीव्र

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप कोणत्याही नावाची घोषणा केलेली नसली, तरी जूनच्या मध्यापर्यंत निवड प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशात ७० नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे ही प्रक्रिया काहीशी मंदावली होती.
पक्ष सूत्रांनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. उत्तर प्रदेशात जातीय समीकरणांना महत्त्व आहे. यापूर्वी ब्राह्मण चेहरा निवडला गेला होता, परंतु आता ओबीसी नेत्याची मागणी वाढल्याने बदलाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री ओबीसी, तर प्रदेशाध्यक्ष ब्राह्मण आहेत. आता पक्ष आदिवासी नेत्याला संधी देण्याच्या विचारात आहे. उत्तराखंडातही ब्राह्मण नेत्याची चर्चा आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (ओबीसी, ओडिशा), शिवराज सिंह चौहान (माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश) आणि मनोहर लाल खट्टर (माजी मुख्यमंत्री, हरियाणा) यांची नावे चर्चेत आहेत. संगठनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय संतुलन असलेल्या नेत्याला प्राधान्य मिळेल.
सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. त्यांना २०२४च्या निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळाली होती. आता पक्ष नव्या चेहऱ्याचा विचार करत आहे. निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय निवडणूक समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, आपसह विरोधी पक्ष बीजेपीच्या या निवडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.




