नवी दिल्ली : पंजाबमधील आपचे नेते संजीव अरोरा यांनी मंगळवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत विजय मिळवून आमदार बनल्याने त्यांनी खासदारकी सोडली. आता रिक्त झालेल्या जागी आप कुणाला संधी देणार याविषयी उत्सुकता असेल. आपची सत्ता असणाऱ्या पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये आपने रिंगणात उतरवलेल्या अरोरा यांनी बाजी मारली. पोटनिवडणुकीवेळी आपने अरोरा विजयी झाल्यास त्यांना मंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्याची ग्वाही नुकतीच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली. आता राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने अरोरा यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. ते १० एप्रिल २०२२ यादिवशी पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत ९ एप्रिल २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी राज्यसभेवर आपमधून कुणाची वर्णी लागणार ते पुढील काळात स्पष्ट होईल. संबंधित जागेवरून पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हेच राज्यसभेत प्रवेश करतील, अशी चर्चा याआधी होती. मात्र, स्वत: केजरीवाल यांनी ती चर्चा फेटाळून लावली.