Suresh Dhas : करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तुल कोणी ठेवलं? सुरेश धस यांनी केला मोठा गौप्यस्फोट

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरदेखील निशाणा साधला. तसेच त्यांनी करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल कोणी ठेवली होती? याबाबतदेखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन साहेबांनी दिलं आहे. बाकीच्या काही गोष्टींबाबत मी साहेबांशी चर्चा केली आहे. त्याचे पत्रही दिलं आहे. त्यातील पहिलं पत्र आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात 10 ते 17 वर्षापासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याबाहेर बदल्या करा, दुसरं वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ते सर्व लोक, त्यांचे नंबर्स पोलिसांना दिले आहेत. त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली.
तसेच करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवलं गेलं. या कट कारस्थाना मागे पोलीस अधिकारी आहेत. साडीतील माणूस कोण आहे? त्याच तोंड स्कार्फने बांधलेलं होतं. स्कार्फवाले लोक पोलीस आहेत. ते अजूनही बीड पोलीस दलात आहेत. त्यांना निलंबित करावं. त्यांची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कामावरून काढून टाकावं किंवा यांनी बाहेर जाऊन नवीन टोळ्या तरी तयार कराव्या अशी टीका सुरेश धस यांनी यावेळी केली.
‘त्या’ मुख्यमंत्र्यांची चौकशी करा
परळी थर्मल पावर स्टेशनला काही अधिकारी गेल्या २० वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत. दर तीन वर्षांनी बदली होत असते. सलग चार वर्ष राहू शकत नाहीत. पाचव्या वर्षी राहायचं असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. त्यामुळे परळी थर्मलला वीस-वीस वर्ष राहण्यासाठी कोण- कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, याची चौकशी झाली पाहिजे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे सुरेश धस यावेळी म्हणाले.





