समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? नेमकं कारण काय? जाणून घ्या सर्वकाही

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याच्या घटनेने सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आणि नागपूरचे डीसीपी प्रशांत स्वामी यांनी अधिकृत खुलासा केला आहे. त्यानुसार, रस्त्यावर खीळे नव्हे, तर दुरुस्तीच्या कामादरम्यान वापरलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स’ या घटनेस कारणीभूत ठरले आहेत.
Nagpur, Maharashtra: DCP Prashant Swami says, “Last night, a video went viral claiming that nails had been placed on the Samruddhi Highway. However, the truth is that maintenance work has been ongoing on this highway… Strengthening work was carried out yesterday using… pic.twitter.com/zWdIRae1vY
— IANS (@ians_india) September 10, 2025
काय घडले नेमके?
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या लेनमध्ये सुमारे 15 मीटर लांबीचे सूक्ष्म तडे आढळले होते. या तड्यांवर ‘इपॉक्सी ग्राउटिंग’द्वारे दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी ‘अॅल्युमिनिअम नोजल्स’ लावण्यात आले होते. हे काम 9 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:30 वाजता पूर्ण झाले.
नागपूरचे डीसीपी प्रशांत स्वामी यांनी सांगितले की, “काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात रस्त्यावर खीळे लावल्याचा दावा करण्यात आला. मात्र, खरेतर महामार्गावर देखभाल आणि बळकटीकरणाचे काम सुरू आहे. काल ‘इंजेक्टेबल नोजल्स’ वापरून हे काम पहिल्या लेनमध्ये केले जात होते, तर दुसरी आणि तिसरी लेन वाहतुकीसाठी खुली होती. बॅरिकेड्स लावण्यात आले होते, पण एका वाहनाने ते तोडले, ज्यामुळे टायर पंक्चर झाले.”
गोंधळाचे कारण –
एमएसआरडीसीने स्पष्ट केले की, कामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी ‘ट्रॅफिक डायव्हर्जन’ची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काही वाहनांनी डायव्हर्जनकडे दुर्लक्ष करत वेगाने नोजल्सवरून प्रवास केला, ज्यामुळे 10 सप्टेंबरच्या रात्री 12:10 वाजता तीन वाहनांचे टायर पंक्चर झाले.
प्रशासनाची तातडीची कारवाई –
घटनेची माहिती मिळताच महामार्ग गस्त वाहन रात्री 12:36 वाजता घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने यात कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाली नाही. दुरुस्तीसाठी लावलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स’ 10 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता काढण्यात आले असून, सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.
दरम्यान, या घटनेत ट्रॅफिक डायव्हर्जनसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे या घटनेने मोठे पडसाद उमटले होते. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आश्वासन एमएसआरडीसीने दिले आहे.





