कोण आहेत रिवाबा जडेजा? जामनगरच्या आमदाराचा गुजरात मंत्रिमंडळात समावेश

अहमदाबाद : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघाच्या भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचा गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी शपथ घेतली. या नव्या कॅबिनेटमध्ये 26 मंत्र्यांचा समावेश असून, रिवाबा जडेजा ही त्यापैकी एक आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशिवाय सर्व मंत्र्यांनी आपल्या राजीनाम्यांची पत्रे सादर केली होती. भाजपच्या सूत्रांनुसार, हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षात “स्ट्रॅटेजिक रिसेट” घडवून आणण्यासाठी घेण्यात आला आहे. गुजरात विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 182 असून, राज्य मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 27 मंत्री असू शकतात.
रिवाबा जडेजा कोण आहेत?
रिवाबा जडेजा यांनी 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या तिकिटावर जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. त्यांच्या प्रचारासाठी पती रवींद्र जडेजा यांनी स्वतःही मैदानात उतरून प्रचार केला होता. रिवाबा यांनी या निवडणुकीत 50 हजारांहून अधिक मतांच्या आघाडीने विजय मिळवला.
या लढतीत त्यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार कर्षणभाई कर्मूर यांचा पराभव केला. आपला सुमारे 23 टक्के तर काँग्रेसच्या बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांना 15.5 टक्के मते मिळाली. रिवाबा जडेजा यांना विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा यांच्या जागी उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, 2024 साली त्यांच्या पती रवींद्र जडेजा यांनीही औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे जडेजा दांपत्य आता पूर्णपणे राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहे.



