Shankar Roy Chowdhury : गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाला कोण जबाबदार? निवृत्त जनरल शंकर रॉय चौधरी यांचा आरोप

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याबाबत मला शंका आहे की, हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. या निष्काळजीपणासाठी कोणीतरी उत्तर दिले पाहिजे. यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. इतके दहशतवादी सीमा ओलांडण्यात कसे यशस्वी झाले याची चौकशी झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल शंकर रॉय चौधरी यांनी केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची उच्च स्तरावर चौकशी केली जावी, असेही ते म्हणाले.
चौधरी म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआयची भूमिका होती. दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांना ठार मारले. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची प्रॉक्सी संघटना द रेझिस्टंट फ्रंट (टीआरएफ) असल्याचा दावा केला जात आहे. आता केवळ पाकिस्तानवर फक्त राजनैतिक दबाव आणणे पुरेसे नाही तर लष्करी कारवाई देखील केली पाहिजे.
चौधरी असेही म्हणाले की, आपल्याला कडक प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. मला हेच वाटते. तथापि, आपण आंतरराष्ट्रीय राजनैतिकता देखील लक्षात ठेवली पाहिजे. आता पुरे झाले. दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळालेली असू शकते. मी हे निश्चितपणे सांगत नाही, परंतु आपण आपले डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत. पाकिस्तान आणि आयएसआय नेहमीच सक्रिय असतात. आमची स्वतःची गुप्तचर संस्था देखील आहे. आपणही त्याचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे.





